ऑफिसच्या प्रवासात सर्वाधिक वेळ जातोय? मग हे नक्की वाचा

You are currently viewing ऑफिसच्या प्रवासात सर्वाधिक वेळ जातोय? मग हे नक्की वाचा

शहरांचा दिवसेंदिवस होत असलेला विस्तार पाहता घरापासून ऑफिसला पोहोचण्यात आणि पुन्हा घरी येण्यातच आपला दिवसातील सर्वाधिक वेळ जातो. मग घरी आणि ऑफिसमध्येही आपली विनाकारण चिडचिड होत राहाते. कधी हा प्रवास दुचाकीवरचा असतो, कधी लोकलचा तर कधी ऑफिसच्या गाडीनेच. मात्र माध्यम कोणतेही असले तरीही आपला बराच वेळ प्रवासात जातो आणि आपण कुटुंबाला आणि अगदी स्वतःलाही वेळ देऊ शकत नाही याचे वाईट वाटत राहते. प्रवास हा शरीराला थकवा आणणारा असतो त्याचप्रमाणे तो मानसिकरित्याही थकवणाराच असतो. त्यामुळे प्रवासाचे गणित सांभाळताना होणारी तारेवरची कसरत कमी करण्यासाठी काही गोष्टींची आवर्जून काळजी घेणे आवश्यक असते.

१. प्रवासात भूक लागल्यास अनेकदा वाटेत थांबणे शक्य नसते. मात्र भूक लागल्याने अॅसिडीटीचा त्रास होण्याची शक्यता असते. अशावेळी आपल्याजवळ खाण्याचे काही पदार्थ ठेवल्यास ते निश्चितच फायद्याचे होईल.

२. प्रवासादरम्यान जास्त वेळ जात असल्याने घरातील गोष्टींसाठी वेळ कमी मिळतो. तसेच ऑफिस आणि घरातील गोष्टी यांचा ताळमेळ घालत असताना सहाजिकच झापेची वेळ कमी केली जाते. त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. प्रवासादरम्यान झोप येईलच असे नसते. त्यामुळे जितके शक्य तितके लवकर झोपून जास्तीत जास्त तास झोप होईल याचा प्रयत्न करावा.

३. प्रवासात जास्त वेळ जात असल्याने व्यायाम करायला वेळ नाही ही सबब अनेक जण सांगताना दिसतात. तसेच प्रवास बसून किंवा फारतर उभ्याने केला जातो. यामध्ये कोणतीही शारीरिक हालचाल होत नाही. त्यामुळे लठ्ठपणा आणि ब्लडप्रेशरचा त्रास होण्याची शक्यता असते.

४. आपला खूप वेळ प्रवासात जात असून आपण आपल्या जोडीदाराला, आई-वडिलांना, मुलाला किंवा मित्रमैत्रीणींना वेळ देऊ शकत नसल्याने अनेक जण प्रवासादरम्यान काही प्रमाणात तणावात असतात. मात्र विकेंड किंवा जेवढा वेळ घरात असतो त्या वेळेच योग्य पद्धतीने नियोजन केल्यास हा ताण काही प्रमाणात कमी होऊ शकतो.

५. प्रवासादरम्यान मोबाईल, टॅब किंवा टीव्हीच्या वापराने डोळे खराब होण्याची शक्यता असते. तसेच पुस्तक किंवा वर्तमानपत्रही जास्त वेळ वाचल्यास डोळ्यांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे ज्या लोकांना सतत चष्म्याची आवश्यकता नसते त्यांनीही प्रवासादरम्यान वाचायचे असल्यास चष्मा आवर्जून वापरावा. किंवा या वेळात वाचण्यापेक्षा किंवा पाहण्यापेक्षा गाणी किंवा इतर गोष्टी ऐकण्याचा पर्याय असू शकतो.

६. अनेक जण प्रवासात असल्याने लघवी लागली तरीही ती दाबून ठेवतात. त्यामुळे या व्यक्तींना आरोग्याचा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रवास सुरु करण्यापूर्वी जाऊन येणे केव्हाही चांगले.

Leave a Reply