आपल्या मोबाइलला ठेवा व्हायरस पासून सुरक्षित

आपल्या मोबाइलला ठेवा व्हायरस पासून सुरक्षित

मे महिन्यात संपूर्ण जगाला खंडणीखोर मालवेअरने हैराण केले होते. अनेकांनी खंडणी भरून आपली माहिती सोडवून घेतली तर अनेकांनी याचा प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या. जग या मोठय़ा सायबर हल्ल्यातून बाहेर येत नाही तोच आता मोबाइलवर म्हणजे अ‍ॅण्ड्रॉइड ऑपरेटिंग प्रणालीमध्ये मालवेअरचा हल्ला झाला आहे. याचा फटका सुमारे तीन कोटी मोबाइलधारकांना बसला आहे. यावर खबरदारीचा उपाय म्हणून गुगलने हा मालवेअर पसरविणाऱ्या सुमारे ४१ अ‍ॅप्सवर बंदी आणली आहे.

 

अशा मालवेअर्सपासून संरक्षण कसे मिळवणार?

पासवर्ड सेव्ह करू नका – ऑनलाइन सुविधांचा वापर करून आपण अनेक गोष्टी करीत असतो. म्हणजे फोनचे बिल भरण्यापासून ते बाजारहाटापर्यंत अनेक गोष्टी मोबाइलवरून होतात. ज्या वेळेस आपण मोबाइलवर साइट सुरू करून लॉगइन करतो, त्या वेळेस आपल्याला तुमचा पासवर्ड सेव्ह करायचा का, असा प्रश्न विचारला जातो. अशा वेळी अनेक जण दर वेळेस कुठे पासवर्ड टाकायचा, या उद्देशाने पासवर्ड सेव्ह करतात. मात्र हे धोकादायक आहे. जर तुमचा मोबाइल हरवला तर तुमच्या सर्व ऑनलाइन व्यवहारांचे तुम्ही सेव्ह केलेले पासवर्ड मोबाइलचोराला सहज मिळू शकतात. ही काळजी विशेषत: बँकिंग किंवा पेमेंट गेटवेच्या अ‍ॅडप्सच्या बाबतीत घ्यावी.

अ‍ॅण्ड्रॉइडमधील इन-बिल्ट सुरक्षा वापरा – तुम्ही अ‍ॅण्ड्रॉइड जेलिबीन किंवा त्याच्या पुढचे व्हर्जन वापरत असाल तर तुम्हाला स्क्रीन लॉकचे पर्याय उपलब्ध आहेत. यात साध्या स्क्रीन लॉकसोबतच एनक्रिप्टेड स्क्रीनलॉकही वापरता येतात. यामुळे तुमचा फोन अधिक सुरक्षित राहू शकतो. या फोन्समध्ये पासवर्ड, पिन, पॅटर्न आणि फेस अनलॉक अशा विविध प्रकारच्या लॉकिंग सुविधा उपलब्ध आहेत. पिन किंवा पॅटर्न लॉक करताना ते थोडे वेगळे किंवा अवघड ठेवा म्हणजे मोबाइलचोराला किंवा हॅकरला ते उघडता येणे शक्य होणार नाही. जर कुणाला लॉक उघडता आले नाही तर फोन चोरीला गेला तरी तुमची माहिती तो मिळवू शकणार नाही.

वाचा -   सायबर सुरक्षा : खरंच आपण सुरक्षित आहोत का?

अ‍ॅप परमिशनचे महत्त्व – गुगल प्लेवरून अ‍ॅप इन्स्टॉल करताना आपल्याला अ‍ॅप्स परमिशनची एक खिडकी दिसते. यामध्ये आपण एखादे अ‍ॅप इन्स्टॉल करीत असताना आपल्या मोबाइलमधील कोणकोणती माहिती वापरण्याचे अधिकार या अ‍ॅप कंपनीला देतो याची यादी असते. आपण ते सर्व न वाचता अ‍ॅक्सेप्ट करून मोकळे होतो. काही अ‍ॅप्समध्ये त्या अ‍ॅपला आवश्यक नसलेल्या गोष्टींचीही परवानगी मागितली जाते. उदाहणार्थ, एखाद्या गेमच्या अ‍ॅपमध्ये आपल्या कॉन्टॅक्ट्सची माहिती घेतात. पण प्रत्यक्षात गेम खेळण्याचा आणि कॉन्टॅक्ट्सचा काहीच संबंध नसतो. तसेच एखाद्या अलार्म अ‍ॅपला तुमचे संदेश वाचण्याची गरज नसते. पण अनेक अलार्म अ‍ॅप्समध्ये संदेशासाठीची परवानगी घेतली जाते. यामुळे अशी अनावश्यक माहिती अनोळखी कंपनींना जाऊ  नये यासाठी अ‍ॅप परमिशन्स नक्की वाचून घ्या. आपण जे अ‍ॅप घेत आहोत त्या अ‍ॅपला खरोखरीच या सर्व गोष्टींची गरज आहे का, हेही पडताळून पाहा. कारण गुगल प्लेवरील सर्वच अ‍ॅप सुरक्षित असतात असे नाही. तसेच एखादे नवीन अ‍ॅप डाऊनलोड करण्यापूर्वी त्या अ‍ॅपचे रेटिंग तसेच त्याच्यावर वापरकर्त्यांच्या आलेल्या कमेंट्स आपण सहसा वाचत नाही. पण जर त्या वाचल्या तर आपल्याला नक्कीच अ‍ॅपविषयी काही माहिती मिळू शकते.

नेटवर्क सुरक्षा – अ‍ॅण्ड्रॉइड उपकरण हॅकर्सपासून वाचविण्यासाठी सर्वात महत्त्वाची काळजी घ्यायची असते ती म्हणजे नेटवर्क सुरक्षेची. सध्या अनेक शहरांमध्ये सार्वजनिक ठिकाणी मोफत वायफायची सुविधा दिली जाते. पण मोफत वायफायचे नेटवर्क शंभर टक्के सुरक्षित असतेच असे नाही. यामुळे शक्यतो ते वापरणे टाळा. अगदीच तुम्हाला वापरायचे असेल तर त्या नेटवर्कचा वापर करून बँकिंगचे व्यवहार करणे टाळा. कारण अशा ठिकाणी हॅकर सहजपणे तुमच्या फोनमधील माहिती घेऊ  शकतो. यावर उपाय म्हणजे तुम्ही तुमची माहिती हाइडनिंजा व्हीपीएनसारख्या अ‍ॅपच्या माध्यमातून वाचवू शकता. या अ‍ॅप्समुळे तुमच्या माहितीचे आऊटगोइंग कनेक्शन हे नेहमी एनक्रिप्टेड असेल. या अ‍ॅप्समुळे कुणालाही सहजासहजी तुमची माहिती मिळवता येणार नाही. याचबरोबर तुम्ही वायफाय प्रोटेक्टरसारख्या अ‍ॅपच्या माध्यमातून खुल्या वायफाय जोडणीतील सुरक्षित जोडणी मिळवू शकता.

वाचा -   फेसबुक लाईव्हमधले नवीन फिचर्स माहितीयेत ?

माहितीचा बॅकअप घेणे – स्मार्टफोनच्या युगात तुमच्या फोनमधील माहितीचा बॅकअप दिवसातून एकदा घेतला गेलाच पाहिजे. कारण फोन कधी आणि कोणत्या वेळी करप्ट होऊ  शकतो याची शाश्वती आपण देऊ  शकत नाही. तसेच हॅकिंग किंवा चोरीची भीतीही आहेच. अशा वेळी जर बॅकअप नसेल तर आपण मोबाइलमधील सर्व माहिती गमावू. आपल्याला चोरीला गेलेला फोन परत मिळाला तरी त्यातील माहिती काढून घेतली तर ती परत मिळू शकणार नाही. जर तुम्ही बॅकअप घेतला असेल आणि फोन तुम्ही रिस्टोअर केला तर तुम्ही बॅकअप घेतलेल्या वेळेपर्यंतची सर्व माहिती तुम्हाला पुन्हा मिळू शकते. काही महत्त्वाची माहिती तुम्ही क्लाऊ ड, तुमचा संगणक किंवा फ्लॅश ड्राइव्हमध्येही साठवून ठेवू शकता.

लेखक – नीरज पंडित

Leave a Reply