नोकरी मध्ये प्रगती साठी कामाव्यतिरिक्त हे करावे….

You are currently viewing नोकरी मध्ये प्रगती साठी कामाव्यतिरिक्त हे करावे….

आखून दिलेले काम संपले की आपला आणि कार्यालयाचा संबंध संपला, असा अनेकांचा दृष्टिकोन असतो. पण कार्यालयीन कामापलीकडे आखलेले कार्यक्रम कर्मचाऱ्याला स्वतचीच नव्याने ओळख देतात. ज्याचा परिणाम अंतिमत: कामासंदर्भातील उत्पादकता वाढवण्यासाठी होतो.

दररोज सकाळी कार्यालयात पोहोचण्यासाठी करावी लागणारी प्रवासाची दगदग, मग दिवसभराचे दमवून टाकणारे काम, साहेबांची टीकाटिप्पणी, सहकाऱ्यांची दडपणे, मासिक, त्रमासिक, वार्षिक लक्ष्य गाठायची धडपड, ग्राहकांशी संवाद/विसंवाद, रात्रपाळी असेल तर दिवसा येणारी झापड आणि इतर अनेक गोष्टी या कार्यालयीन आयुष्य चाकोरीबद्ध करून टाकतात. दिवसांमागून दिवस जातात आणि एक कंटाळा भरून राहतो. आयुष्य निरस होते, कार्यक्षमतेवर परिणाम होतो. असे दमलेले भागलेले कर्मचारी असलेले कार्यालय लगेच ओळखू येते.

खरं म्हणजे आपलं व्यक्तिमत्त्व, आपली ओळख ही काही कामापुरती मर्यादित नसते. प्रत्येकाकडे काहीतरी एक कला, किंवा छंद असतात आणि त्यामुळेच त्या व्यक्तीचे जीवन संपन्न होत असते. म्हणूनच चाकोरीबद्ध कार्यालयीन कामाचा कंटाळा घालविण्यासाठी काही छान सांस्कृतिक/सामाजिक कार्यक्रम नियमित, पण कार्यालयीन वेळेबाहेर आखले तर त्याचा वैयक्तिक अथवा गटाच्या उत्पादकतेवर सकारात्मक परिणाम होतो. अशा कार्यक्रमांमुळे पुढील गोष्टी होतात.

  • कर्मचाऱ्यांचे व्यक्तिमत्त्व उजळते व एक नवीन ओळख निर्माण होते.
  • कर्मचाऱ्यांची सर्जनशीलता वाढते.
  • एकत्र सांघिक कार्य करणे अधिक सुलभ होते.
  • सामुदायिक जबाबदारीची भावना दृढ होते.
  • काही जणांना स्वत:च्याच आतापर्यंत न समजलेल्या गुणावगुणांची, मर्यादांची व क्षमतेची नव्याने जाणीव होते.
  • सामाजिक संवेदनशीलता विकसित होते.
  • कर्मचाऱ्यांचे नेतृत्वगुण दृग्गोचर होतात व त्याचा कंपनीला फायदाच होतो.

नोकरीच्या या पहिल्या वर्षांत तुमच्या कार्यालयाच्या प्रकृतीनुसार तुमचे सहकारी औपचारिक किंवा अनौपचारिक असे अनेक सांस्कृतिक / सामाजिक कार्यक्रम आखत असतील. त्यात तुम्ही सक्रिय भाग घेतला पाहिजे, म्हणजे तुमच्यातील सुप्त गुण, कला व नेतृत्व सगळ्या सहकाऱ्यांना कळून येईल. मात्र हे करताना पुढे दिलेल्या गोष्टीसुद्धा लक्षात ठेवा.

  • जे गुण, कला तुम्हाला अवगत आहेत, त्यासंबंधीच्या कार्यक्रमात पुढाकार घ्या.
  • ज्या सहकाऱ्यांनी विविध कलागुणांत याआधी प्रावीण्य दाखविलेले आहे त्यांच्याशी परिचय करून घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करा.
  • तुम्हाला येणाऱ्या कलागुणांसंबंधी अहंकाराचे प्रदर्शन टाळा.
  • इतरांच्या कलागुणांच्या गुणवत्तेविषयी टीकाटिप्पणी कटाक्षाने टाळा.
  • एखाद्या कार्यक्रमाच्या आयोजन समितीमध्ये स्वयंप्रेरणेने काम करावयाची तयारी दाखवा.
  • दिलेले कुठलेही काम अतिशय प्रामाणिकपणे, नम्रतेने, हुशारीने व नि:पक्षपातीपणे करा.
  • बहुतांश वेळेला हे सांस्कृतिक / सामाजिक कार्यक्रम अनौपचारिक वातावरणात साजरे होतात. तरीसुद्धा त्यात सहभागी होणाऱ्या सहकाऱ्यांचे व तुमचे वय आणि हुद्दा अजिबात विसरू नका.
  • काहीवेळा या कार्यक्रमांमध्ये सहकाऱ्यांच्या कुटुंबीयांनासुद्धा आमंत्रण असते. अशा वेळी त्यांची ओळख करून घ्यायचा प्रसंग आला तर त्यांना यथायोग्य आदर द्या. अतिशय नम्रपणे अल्पशब्दात स्वपरिचय करून द्या.

भोजन, नाश्ता, प्रवास व स्नेहसंमेलने अशा काही प्रसंगांत सहकाऱ्यांच्या बरोबर असताना काही विशिष्ट ठिकाणी नेमके शिष्टाचार पाळणे आवश्यक असते. त्याची माहिती करून घ्या व त्याप्रमाणे वागा, म्हणजे तुम्हाला व इतरांना अवघडलेपण वाटणार नाही.

काही नाठाळ सहकाऱ्यांच्या नादी लागून कुठलेही गैरप्रकार करायचे टाळा, की ज्यामुळे, तुमचे स्वत:चे, तुमच्या गटाचे व कंपनीचे नाव खराब होईल.

अशा अनौपचारिक सांस्कृतिक/सामाजिक कार्यक्रमांत कुणाल्या तरी अतिउत्साहाने किंवा नाठाळपणाने संकटात/अपघातात सापडल्याची उदाहरणे आपण नेहमी वाचत असतोच. अशा वेळी तुम्ही स्वत: कायम सतर्क राहा व इतरांना सुरक्षित राहण्यासाठी मदत करा.

कार्यालयाने आयोजित केलेल्या सर्व सांस्कृतिक/सामाजिक कार्यक्रमांत दिलखुलासपणे भाग घ्या. तुमच्या स्वत:च्या आणि सहकाऱ्यांच्याही लक्षात येईल की, तुमच्या व्यक्तिमत्त्वाची एक नवीन ओळख निर्माण होते आहे. आतापर्यंतच्या शैक्षणिक जीवनात तुम्ही असे इतर कलागुण विकसित करण्यासाठी काहीच प्रयत्न केले नसतील तर तुम्हाला हीच संधी आहे. आजपासूनच आवडीचे छंद, कला, खेळ, गायनवादन, चित्रकला/फोटोग्राफी, लिखाण जोपासा; सहली, गिर्यारोहण, सांस्कृतिक/सामाजिक संस्था आदीच्या कार्यक्रमांत सहभाग घ्या. पुढच्याच वर्षी लक्षात येईल की तुमच्यात किती सकारात्मक बदल झाले आहेत.
लेखक – डॉ. जयंत पानसे

Leave a Reply